लसीच्या कच्च्या मालासाठी अदर पुनावालांची थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विनंती

पुणे : देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच विनंती केली आहे.

अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.

शुक्रवारी अदार पूनावाला यांनी ट्वीट केले की, “ आदरणीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जर आपण खरोखरच विषाणूचा पराभव करण्यासाठी एकजूट असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेबाहेरील लस उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा. जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल. आपल्या प्रशासनाकडे सविस्तर माहिती आहे.” अद्याप यावर अमेरिकेकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.

 

“शक्य असतं, तर मीच अमेरिकेत आंदोलन केलं असतं”
अदर पुनावाला यांनी याआधीही कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं होतं. यावेळी त्यांनी शक्य असतं तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं असं म्हटलं होतं. “मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील करोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं होतं.

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. सहा महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं होतं.

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.