वॉर्ड बॉयनं एकाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून दुसऱ्याला लावला, कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

भोपाळ: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही आहेत. तर बऱ्यात राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकटात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या घटना समोर येत आहेत. तर कुठे याच्या अगदी उलट प्रकार पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात अशीच घटना घडली आहे.

शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका कोरोना रुग्णांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. रुग्णाची अवस्था गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्याचं निधन झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळंच चित्र समोर आलं. रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव  सुरेंद्र शर्मा होतं. मंगळवारी रात्री सुरेंद्र यांचा मुलगा दीपक यानं रात्री ११.०० वाजता आपल्या वडिलांसोबत फोनवर संवाद साधला. दुसऱ्या दिवशी थेट रुग्णालयातून फोन आल्यानंतर दीपक रुग्णालयात दाखल झाला

दीपकच्या म्हणण्यानुसार, वडिलांची तब्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुधारत होती. ते व्यवस्थित जेवणही घेत होते. रात्री कुणीतरी अचानक त्यांचा ऑक्सिजन हटवला. त्यानंतर ते तडफडत राहिले. सकाळी मला फोन आल्यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टर आणि नर्सेसना ऑक्सिजन देण्यासाठी विनंती केली. परंतु, त्यांनी ऑक्सिजन पुरवला नाही. १०-१५ मिनिटांनी वडिलांचा मृत्यू झाला.

 

 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोंधळ झाल्यानंतर रुग्णालयानं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यामध्ये, एक तरुण सुरेंद्र शर्मा यांचा ऑक्सिजन सपोर्ट हटवत असल्याचं आणि समोरून आलेल्या गार्डनंही त्याला यासाठी मदत केल्याचं यामध्ये दिसतंय.

या प्रकरणात शिवपुरी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अक्षय निगम यांनी सारवासारव सुरू केली आहे. रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण ६ ग्रॅमवर आलं होतं. त्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती. त्यामुळेच नर्सच्या सांगण्यावरून वॉर्ड बॉयनं सुरेंद्र यांच्या बेडजवळील पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढला आणि तो दुसऱ्या रुग्णाला दिला, असं निगम यांनी सांगितलं.

हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनानं शल्य चिकित्सा विभागाचे अध्यक्ष डॉ. अनंत कुमार राखोडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत केली. येत्या ४८ तासांत प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.