हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : एका २७ वर्षीय आईने आपल्या सात वर्षीय आणि दीड वर्षीय  लेकरांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी (ता.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेवराई तांडा (ता.औरंगाबाद) येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागील एका शेतात घडली.

वैशाली रवींद्र थोरात (वय २७, रा. गेवराई ता.औरंगाबाद)), असे विवाहितेचे नाव असून मुलगी आरोही (वय ६ ), मुलगा पियुष (वय ३ ) अशी मृत लेकरांची नावे आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन्ही चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे तर मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे

चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, सुनीता शेखर देसरडा यांचे गेवराई तांडा येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागे शेत असून या शेतातील विहिरीत त्यांच्या कामगाराला तीन मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती त्याने चिकलठाणा पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कुंभार, बिट जमादार काशिनाथ लुटे, संपत राठोड, दीपक सुरासे, महानगर पालिका फायर ब्रिगेडचे चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने वैशालीसह दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरी बाहेर काढल्यावर मृत महिला ही गेवराई येथील रहिवासी असल्याचे परिसरातल्या लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मृत महिला वैशाली हिच्या सासरच्या लोकांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृत वैशाली हिच्या माहेरच्या लोकांची माहिती घेतली असता तिचे माहेर हे औरंगाबाद येथील क्रांतीनगरातील असल्याचे समोर आले. तिच्या माहेरच्या लोकांना या दुर्दैवी घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहचलेल्या माहेरच्या लोकांनी वैशाली व तिच्या मुलांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैशाली आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. माहेरच्या नातेवाईकांनी दोषी व्यक्तींना अटक करेपर्यंत आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या घटनेची चिकलठाणा पोलिसांनी नोंद केली असून आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.