कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान मोदींचं आवाहन, आखाड्याचा तातडीने रिप्लाय,

नवी दिल्ली  : शुक्रवारी देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कोरोना संकटात होत असलेल्या कुंभ मेळ्यावर मोठं भाष्य केलं. हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन या कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा आणि त्याची सांगता करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

 

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वामी अवधेशानंद म्हणाले, ” पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाचं रक्षण हे पुण्य आहे. माझं धर्म परायण जनतेला आवाहन आहे, कोरोनाच्या स्थितीत कोव्हिड 19 नियमांचं पालन करा.

कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

निरंजनी आखाड्याची घोषणा

हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी  झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, महात्मांना परत जाण्याची विनंती केली गेलीय. 17 एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.