पाटस टोलनाका सिक्युरिटी गार्डकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व तलवार जप्त ; पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

पाटस : पाटस टोलनाका सिक्युरिटी गार्डकडून पुणे ग्रामीण एलसीबी शाखेच्या पोलीसांनी गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व तलवार,बुलेट मोटर सायकल व मोबाईल असा एकुण एक लाख सत्तर हजार चारशेचा माल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

धनाजी मारुती माकर (वय ४४ वर्षे रा.पडवी, गायकवाड वस्ती, ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्हयात संचारबंदी अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके नेमलेली आहे. १६ एप्रिल  रोजी रात्री ११च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकुंद कदम यांचे पथक यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना पाटस चौक येथे आले असता त्यांना एका काळे रंगाचे बुलेट मोटरसायकल वर पडवी-पुसेगाव मार्गे पाटस टोल नाका येथे एक व्यक्ती त्याच्या कमरेला गावठी पिस्टल व बुलेट मोटर सायकलला तलवार अडकवून घेऊन जात आहे. अशी बातमी मिळालेने लगेच गुन्हे शाखेचे पथकाने पाटस कारखाना रोड, पाटस चौक या ठिकाणी बॅरिकेटचा अडथळा केला. थोड्याच वेळात बुलेटवर आलेला संशयास्पद इसमास त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी धनाजी यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच त्याचेकडील बुलेटला साईडला लावलेली तलवार सुद्धा मिळून आली.

आरोपीच्या ताब्यात मिळालेला गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, तलवार, बुलेट मोटर सायकल व मोबाईल असा एकुण एक लाख सत्तर हजार चारशेचा माल जप्त करून जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी धनाजी माकर याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

आरोपी धनाजी माकर हा चौफुला, कुसेगाव, पडवी, पाटस परिसरात कमरेला गावठी कट्टा व बुलेटला तलवार बाळगून दहशत करीत फिरत असायचा. प्राथमिक चौकशीत आरोपी धनाजी माकर हा पाटस टोल प्लाझा येथे सिक्युरिटी गार्ड चे काम करीत असल्याची माहिती मिळालेली आहे.

सदरची कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकुंद कदम यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.