महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र शासनानं सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्रानं यासंबंधीचे निर्देश दिले असून,महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रानं ही काय परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे हा थेट सवाल उपस्थित करत, या औषधांच्या विक्रिला परवानगी द्या नाहीतर महाराष्ट्राच्या भूमीवर असणाऱ्या या औषधांच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत एफडीएच्या मंत्र्यांच्या मदतीने पावलं उचलत कारवाई करत कंपन्या सील करु आणि औषधांचा जनतेला पुरवठा करु असा थेट इशारा त्यांनी दिला.

नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असे नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे

परवाना रद्द करणार

दरम्यान राज्यसरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

तर साठा ताब्यात घेऊ

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या 16 निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता फतवा काढा, ज्यांना मृत्यू कोरोनामुळं होतोय त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यास उद्यापासून सुरुवात करा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला. देशातील आरोग्यमंत्री बेजबाबदारपणे काम करत असून, मोदींचं याकडे लक्ष नाही. पण, वेळ अजूनही गेलेली नाही, पंतप्रधानांनी यात लक्ष द्यावं. सध्याच्या घडीला होणाऱ्या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर लक्ष द्या, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही लक्ष द्या म्हणत त्यांनी केंद्र शासनाला सतर्कही केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांत असूनही ते मात्र बंगालमध्ये प्रचारात व्यग्र आहेत. यावरुन हेच सिद्ध होत आहे की पंतप्रधानांना देशातील नागरिकांच्या जीवापेक्षा निवडणूक जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.