आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुंडाविरोधी पथकाला सट्टेबाजांनी धक्काबुक्की; तिघांना अटक

पिंपरी चिंचवड : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुंडाविरोधी पथकाला सट्टेबाजांनी धक्काबुक्की केली असून त्यात पोलीस कर्मचार्‍याला मुका मार लागला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.ही कारवाई आकुर्डीतील पंचातारानगर येथे शुक्रवारी (दि.१६) रोजी रात्री करण्यात आली.

श्रीपाद मोहन यादव (वय २२, रा. सुंदर आनंदी निवास, पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय ३५, रा. सेक्टर २७, निगडी) आणि नितीश रामदास काळे (वय २१, रा. कोमल निवास, पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार किशोर रेहाल ऊर्फ किशोरभाई (रा. चेंबूर) या मुख्य सुत्रधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरभाई याच्या मदतीने तिघे जण आय पी एल मध्ये चालू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर लोटस ऑनलाईन सट्टा खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून कारवाई केली. त्यावेळी आरोपी ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करत गडबड गोंधळ आणि दहशतीचे वातावरण तयार केले.त्यावेळी झटापट झाल्याने फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना मुका मार बसला. जुगार कायद्याबरोबरच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.