पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक
पुणे : कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट तयार करून देणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.जंगली महाराज रस्त्यावरील एका वैद्यकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या नावाने आरोपींनी बनावट अहवाल दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेमडिसीवीरचा काळाबाजार सुरू असताना बनावट करोना चाचणी रिपोर्ट देणाऱ्यांचे रॅकेट समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत जंगली महाराज रस्ता परिसरातील प्रयागेशाळेच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीनपॅथ डायग्नोस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लॅबच्या नावाने अज्ञात व्यक्ती कोविड RT-PCR चाचण्यांचे बनावट रिपोर्ट देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून वरील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्राथमिक चौकशी नुसार आरोपींनी अनेक लोकांचे कोविड RT-PCR चाचण्यांचे बनावट रिपोर्ट बनवून दिल्याची सांगितले. या रॅकेटमध्ये आणखीनही काही आरोपींचा समावेश आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी वेळीच या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता मान्यताप्राप्त असलेल्या लॅबमधूनच चाचणी करून खात्रीशीर रिपोर्ट घ्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर पोलीस उपनिरीक्षक अभिजीत कुदळे, पोलीस कर्मचारी इनामदार, देवढे, शिंदे, पाटील, आणि पानपाटील यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!