वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

बावधन : वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाच जणांच्या टोळक्याने दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना बावधन बुद्रुक येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) बावधन बुद्रुक येथील घुले स्क्वेअर पाटील नगर येथील हायक्लास सोसायटी जवळ रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

मंदार अर्जुन घुले, महेश अर्जुन घुले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर वैभव हरिश्चचंद्र पडवळ, शैलेश मधुकर घुले, रणजित मुंजकर ऊर्फ गड्ड्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बावधन ग्रामपंचायतीचे कर्मचारी विकी राजु मारवाडी कुंभार (वय-30 रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बावधन ग्रामपंचायत येथे सुपरवायझर म्हणून काम करतात. शुक्रवारी बावधान ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी फिर्यादी यांना ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावलेले   वाढदिवसानिमित्त तसेच इतर फलक काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार फिर्यादी आणि ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी यांनी फलक काढले. त्यामध्ये भकाजी कॉर्नर, बावधन येथे आरोपी मंदार घुले याच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर देखील फिर्यादी यांनी काढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोपी मंदार घुले याने फिर्यादी यांना फोनवरून शिवीगाळ केली. तसेच शुक्रवारी रात्री घुले स्क्वेअर येथे भेट नाहीतर बघ, अशी धमकी दिली. त्यावरून फिर्यादी आणि ग्रामपंचायतीचे अन्य कर्मचारी आरोपी मंदार याला भेटण्यासाठी गेले. तिथे आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. फिर्यादी आणि त्यांचे अन्य कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.