VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीसाची मध्यरात्री थेट पोलीस स्थानकात एण्ट्री, अधिकाऱ्यांवर का भडकले?
मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.
बीकेसी पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाडही सोबत होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आलं.
म्हणून मी भाजपच्या नेत्यांसह पोलीस ठाण्यात आलो: फडणवीस
पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.
पोलिसांचं म्हणणं काय?
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
काय आहे सगळा प्रकार?
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!