ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे 

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेड शिल्लक नसल्याची ओरड सुरू आहे. मात्र,ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 15 ते 20 ऑक्सिजन बेड आणि 30 ते 40 सामान्य बेड शिल्लक असून बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. असा आरोप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. तसेच, कोविड रुग्णालय ज्यांना चालवण्यासाठी दिले आहे ते फक्त बिले गोळा करण्याचे काम करत असल्याचे वाघेरे म्हणाले.

भाजप नगरसेवक यांनी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयाची पाहणी केली असता त्यांना त्याठिकाणी ऑक्सिजन व सामान्य बेड शिल्लक असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी व्हिडिओ देखील चित्रीत केले आहेत. संदीप वाघेरे म्हणाले, ‘ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्याठिकाणी 15 ते 20 ऑक्सिजन बेड आणि 30 ते 40 सामान्य बेड शिल्लक असल्याचे दिसून आले. पण, रुग्णांना बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते, पर्यायी रुग्णांची वायसीएम, जम्बो कोविड सेंटर अशी फरफट होते. शहरात परिस्थिती हाताबाहेर जात असताना प्रशासनचा भोंगळ कारभार सुरू आहे’.

‘ज्यांना कोविड सेंटर चालवण्यासाठी दिले आहेत, ते सेंटर व्यवस्थित चालवत नाहीत. फक्त बिले गोळा करण्याचे काम ते करत आहेत’, असा घणाघाती आरोप वाघेरे यांनी केला. दररोज शहरात तीन हजारांच्या आसपास रुग्णवाढ होत आहे तर, पन्नास रुग्णांचा मृत्यू होतो आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णांची फरफट होत असताना प्रशासन बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न का करत आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

डॉक्टर विनायक पाटील म्हणाले, ‘रुग्णांची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ॲटोक्लस्टर कोविड रुग्णालयावर विशेष लक्ष देत, योग्य नियोजन करावे लागेल. तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृतांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून परिस्थिती हाताळली पाहिजे’ असं पाटील म्हणाले.

दरम्यान, आज दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात (रविवारी, दि. 18) दोन हजार 830 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दिवसभरात 2 हजार 318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या शहरात 22 हजार 682 सक्रिय रुग्ण आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.