लॉकडाऊन मुळे छोट्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले
कामशेत; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षांपासून लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. काही निर्बंध उठवून कुठेतरी कमाई सुरू होत होती. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली.
या लाटेमध्ये मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने कडक संचारबंदीचा निर्णय घेतला; परंतु या संचारबंदीमुळे सर्वसामान्य माणसाबरोबर जे छोटे व्यापारी, दुकानदार, चहाटपरी व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर मात्र हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
कोविडमुळे तालुक्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वीटभट्टी कामगारांपासून ते शेतमजुरांपर्यंत कोणाच्याच हाती काम राहिले नाही. गेल्या एक वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात छोटे व्यावसायिक, दुकानदार, मजूर वर्गाची संख्या जास्त प्रमाणात आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था फार दयनीय झाली आहे.
व्यवसाय सुरू करत असताना बँका आणि स्थानिक पतसंस्थांकडून कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. व्यवसायाला चांगली सुरुवात झाली होती. बँका, पतसंस्थेचे हफ्ते एकदम सुरळीत जात होते. मात्र, मागील मार्च पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांचे हफ्तेही वेळेत भरता आले नाहीत. त्यामुळे व्यवसाय बंद व व्याज चालू आहे. त्यामुळे बँकांचे हफ्ते भरायचे कसे, हा प्रश्न तालुक्यातील छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना पडत आहे.
कोरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारी वर्गाने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले असून विस्कटलेली ही घडी अद्याप सावरली गेली नाही तोच आता परत संचारबंदी लागू केली आता आम्ही जगायचं कसं..?
अनिरुद्ध अंबर्डेकर
बांधकाम व्यावसायिक
“कोरोना” चे संकट आल्यावर व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत साथ दिली. अनेक महिने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मार्केट बंद होते. ‘अनलॉक’ झाल्यावरदेखील काही दिवस सर्व व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत दुकाने बंद ठेवली होती. परंतु आता पुन्हा संचारबंदीने आमचे कंबरडे मोडले आहे.
प्रवीण सुतार व मनोज जगताप
इलेक्ट्रॉनिक व्यापारी
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!