कोरोणाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे याची परिक्षा कशी कराल? जाणून घ्या
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.
कोणी करावी?
ताप, सर्दी, खोकला किंवा कोव्हिड-१९ ची इतर लक्षणे असणाऱ्या व्यक्ति. घरगुती विलगीकरणात (होम आयसोलेशन) मध्ये असणाऱ्या व्यक्ति
आवश्यक साहित्य
घडयाळ/स्टॉपवॉच (मोबाईल फोन) पल्स ऑक्सिमीटर
कुठे करावी?
ही चाचणी कुठल्याही कड़क जमिनीवर/पृष्ठभागावर (hard surface) वरच केली जावी. ज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ-उतार नसावेत. पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही. घरातल्या कडक फरशीवर करणे कधीही चांगले चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.
कशी करावी
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱयांवर चालू नये).
असे असेल तर काळजीचे काही कारण नाही
सहा मिनिटे चालल्या नंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे. जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही, यामध्ये काही बदल होत नाही हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करावी.
असे असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्याा
रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्या नंतर ९३ पेक्षा कमी होत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.
चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा ३ टक्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो.असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.
सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम/धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.
इतर महत्वाचे मुद्दे
६० वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्ति ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालूनदेखील ही चाचणी करू शकतात.
चाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसवणे चांगले, जेणेकरून खूप दम लागला तर ती मदत करू शकेल. बसल्याजागी ज्यांना दम/थाप लागत असेल त्यांनी ही चाचणी करू नये.
चाचणी करतेवेळी जर ऑक्सिमीटर वरील ऑक्सिजन पातळी 3% पेक्षा अधिकने घटली किंवा ९३% पेक्षा कमी झाली तर चालणे लगेच थांबवा आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!