खळबळजनक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, कहर म्हणजे नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायले 

कदमवाकवस्ती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यासाठी पंचवीस आणि अंत्यविधीसाठी फक्त वीस लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती परिसरात एका कुटुंबातील एक सत्तर वर्षीय जेष्ठ नागरिक अल्पशा आजाराने मृत्यमुखी पडल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. तसेच अंत्यविधी करताना नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे पाय धुवून ते पाणी मृताच्या नातेवाईकांनी पिल्याची खळबळजनक घटना कदमवाकवस्ती परिसरात समोर आली आहे.

शासनाने अंत्यविधीसाठी वीस लोकांची परवानगी दिलेली आहे.परंतु पूर्व हवेलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या धोकादायकरित्या वाढत असून देखील नागरिक मात्र अंत्यविधीसाठी शेकडोंच्या संख्येने गोळा होत असून स्वतःचा व दुसऱ्याच्या जीव धोक्यात घालत आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर  पोस्ट टाकून  हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर लोणी काळभोर  पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून जर कोणी लग्न सोहळा,  अंत्यसंस्कार करत असतील तर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून संबंधितावर कारवाई करतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.