“हवं तर हात जोडतो, पण…”; आरोग्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

मुंबई : राज्यातील गंभीर कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता राज्यातील जनतेला एक कळकळीचे आवाहन केले आहे. “कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या दुखणी अंगावर काढू नका. उशीर झाल्याने पेशंट गेला हा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहेत”, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२० एप्रिल) केले आहे. एकीकडे महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत आहे तर दुसरीकडे देशभरातही कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान सध्या सरकारपुढे आहे.

“कोरोनाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब तपासणी केली पाहिजे. कुठलंही दुखणं अंगावर काढणे म्हणजे धोकादायक आहे. अंगावर दुखणे काढलेले पेशंट नंतर सिरीयस होतात आणि दगावतात”, असे म्हणत राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात असून आता १ एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनीही प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असेही राजेश टोपे म्हणाले. त्याचप्रमाणे,नागरिकांनी राज्य सरकारचे नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.

राज्य सरकारकडून मिशन ब्रेक द चेन

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन हा कार्यक्रम सुरू केला आहे. अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहेत. त्यांचे पालन झालच पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे, असेही टोपे यांनी नमूद केले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. लसीकरण वाढले की, हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जाऊ शकू, असेही टोपे म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.