ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधांची नियमावली जारी; काय सुरू आणि काय बंद?

मुंबईः महाराष्ट्रात उद्या (22 एप्रिल) संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.

खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी

सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार

यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

काय सुरू असेल?

 • उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन
 • मुंबई लोकलचा प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच करता येणार
 • खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच
 • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा.
 • सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
 • लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार.
 • लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.
 • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी

काय बंद असेल?

 • रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सेवा बंद असतील.
 • रस्त्यालगत असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील.
 • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.
 • सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.
 •  केशकर्तनालये, स्पा, सलोन, ब्युटी पार्लर्स बंद राहतील
 • शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
 • धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.