कुसुंब्यात डबल मर्डर ! गळा आवळून पती-पत्नीची हत्या

जळगाव :जळगाव शहराला लागून असणार्‍या कुसुंबा गावानजीकच्या परिसरातील रहिवासी असणार्‍या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली.

आशा मुरलीधर पाटील (वय ४७) आणि  मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४ ) असे खून झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.

पत्नी आशा यांचा मृतदेह तळ मजल्यावरील मागच्या रूममध्ये आढळून आला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर यांचा मृतदेह हा वरील मजल्यावरच्या रूममध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही पती-पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असून यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कुसुंबा येथील ओम साई नगरात मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई असे दोघेच राहत होते. मोठी मुलगी शीतल हिरालाल पाटील (२४,रा. वेले, ता.चोपडा) ही कुसुंबा येथे तर लहान मुलगी स्वाती उमेश पाटील ही (२२,रा.सावखेडा ता. यावल) ही नंदुरबार येथे वास्तव्याला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता स्वाती ही आई वडिलांना फोन करत होती, परंतु त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.त्यामुळे तिने याच परिसरात राहणारी आजी रुखमाबाई लक्ष्मण पाटील हिला फोन करून आई, वडीलांशी संपर्क होत नाही, काय झाले आहे ते जावून बघ असे सांगितले. त्यानुसार रुक्माबाई या जावई संतोष कुंडलिक पाटील (रा.कुसुंबा) यांना सोबत घेऊन मुरलीधर पाटील यांचे घर गाठले असता घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता, तर मागील किचनकडील दरवाजा उघडा होता. बाजूच्या खोलीत मुलगी आशाबाई मृतावस्थेत पडलेले होती हे दृश्य पाहून रुखमाबाई व संतोष पाटील यांना धक्का बसला. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाट उघडे होते तर गच्चीवर मुरलीधर पाटील हे देखील मृतावस्थेत दिसून आले. पती-पत्नीचा खून झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. दुपारी चार वाजता ही घटना पोलिसांना समजली.

रात्रीच झाला आहे खून

मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. शरीरावरील व्रण पाहता ही घटना रात्रीच घडण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. गच्चीवर मुरलीधर पाटील यांच्या मृतदेहाजवळ महिलेची चप्पल आढळून आली, हि चप्पल आशाबाई यांचे नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय फोर्स मध्ये खाट पडलेली होती, त्यावर अंथरूण होते. पाटील खाटेवर झोपण्याचा संशय असून मारहाण करणार्‍यांनी त्यांना गच्चीवर आणले असावे याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मृतदेहापासून काही अंतरावर दोरी आढळून आली आहे.

दरम्यान, हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला की, कुणी चोरीच्या उद्देश्याने घरात येऊन त्यांचा झटापटीत खून केला याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. तर अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षख कुमार चिंथा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.