महाराष्ट्राला सध्या २० कोटी लसींची गरज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदार पुनावालांशी चर्चा

मुंबई :कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार लसीकरणावर भर द्यायचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकार राज्याला पुरेश्या प्रमाणात लस देत नाही, असा आरोप केला जात होता. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला 50 टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता राज्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ न घालवता सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे ५.५ कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे आता सीरम महाराष्ट्राला किती वेगाने लसी उपलब्ध करुन देणार, हे पाहावे लागणार आहे.

सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अशातच आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला ५० टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने आता महाराष्ट्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार कोरोना लसींच्या वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात येतो. आता १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला मुभा दिल्यानंतर केंद्र सरकारने 50 टक्के लसींचा साठा खरेदी करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. त्यामुळे आता राज्यांना कोव्हीशिल्डचे उत्पादन करणारी सिरम आणि कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी थेट बोलावे लागणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.