राजापूरच्या योगेश मदने टोळीवर मोक्का
सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यातील महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीतील पाच जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर सातारा जिल्ह्यात तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने (रा. राजापूर, ता. खटाक), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने (रा. उपळके, ता. फलटण), महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक, फलटण), किरण मदने (पूर्ण नाव माहीत नाही, रा. राजापूर, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. योगेश 18, सनी 5, प्रथमेश 3, महेश 21, तर किरण यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. किरण हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.
23 फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास युवक-युवती हे वीर धरण परिसरात फिरायला गेले होते. यावेळी या टोळीने त्यांना मारहाण करण्याची धमकी देऊन सोन्याची साखळी, टॉप्स, मोबाईल असा 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे या गुन्ह्याचा तपास करीत होते. दरम्यान, फलटण ग्रामीण पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित हे ताथकडा (ता. फलटण) घाटात सापडले. त्यांनी गुह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवजही जप्त करण्यात आला.
तपासामध्ये या टोळीने संघटितपणे फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिह्यातील बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग व जोड रस्त्यावर नागरिकांना थांबवून दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव शिरवळ पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता, त्याला त्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार शिरकळ पोलीस ठाण्यातील लुटमारीच्या गुन्ह्यात मोक्काचे कलम वाढविण्यात आले आहेत. फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे तपास करीत आहेत.
टोळीप्रमुखाला दुसर्यांदा ‘मोक्का’
या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये मोक्का लावण्यात आला आहे. टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (वय 25) याच्यावर यापूर्वी देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ते नुकतेच जेलमधून सुटले होते. आता दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई करून पोलिसांनी त्यांना चांगलेच जेरीस आणले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!