कामशेतमध्ये अवैध देशी दारूचा साठा जप्त, तीन जणांवर गुन्हा दाखल

कामशेत : कामशेत येथील पवना चौकाजवळील एका खोलीत देशी दारूच्या बाटल्यांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्या टोळीवर कामशेत पोलिसांनी गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता छापा टाकून कारवाई करत १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सचिन वाळुंज, अविनाश जाधव, कृष्णा संतराम चौधरी (सर्व रा. कामशेत) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सचिन वाळुंज याला अटक केली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पवना चौकातील एका खोलीत बेकायदेशीररित्या देशी दारूच्या बाटल्यांचा साठा करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कामशेत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे व पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार समीर शेख व चालक दत्ता शिंदे यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला असता त्याठिकाणी १२ हजार ७३८ रुपयांच्या ३९४ टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर हे करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.