सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयने घेतले ताब्यात

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. अनिल देशमुखांना नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय ने गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी नागपूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे 5 जण अनोळखी असल्याचे गुन्ह्यात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी या रकान्यात अनिल देशमुखांचेही नाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यानी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी सुरू असतानाच देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलं असुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला सीबीआयनं अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

10 ठिकाणी छापे

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 दिवस फक्त चौकशी

कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कारवाईवर सध्या टिप्पणी करणं योग्य नाही : संजय राऊत
“सीबीआय आपलं काम करेल. कायद्यासमोर कोणीही मोठी नाही. सीबीआयच्या कारवाईवर सध्या कोणतंही मत व्यक्य करणं योग्य नाही. अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयच्या छाप्यावर व्यक्त केली.

 

ईडी आणि सीबीआयचा राजकीय हेतूने वापर : हसन मुश्रीफ
ईडी आणि सीबीआयचा वापर राजकीय हेतूने होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यांनी भाजपवर केला आहे. तसंच एका पत्रावर एवढी कारवाई होऊ शकते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा विश्वास आहे, असं मुश्रीफ म्हणाले. माझ्यावर देखील ईडीने कारवाई केली होती. लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.

सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख  यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.