मोठी बातमी ! अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा

मुंबई  :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख  यांच्यासह इतरांविरुद्ध सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे.  परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआय चौकशी करत आहे. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे. सीबीआयनं दहा ठिकामी छापेमारी केली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10 ठिकाणी छापे

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 दिवस फक्त चौकशी

कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देशमुखांपुढील पर्याय काय?

दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.

सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख  यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.