डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम व विद्युत ऑडिट करण्याच्याही सूचना

नाशिक :  झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम तसेच विद्युत उपकरणांचेही ऑडिट लवकरात लवकर करून पुढे अशी कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आज मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष सिंग, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तर रुग्णालयातून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव,अधीक्षक अभियंता एस.एम.चव्हाणके, कोरोना नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, तसेच डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, विभागातील रूग्णालयांच्या शासकीय, खाजगी इमारतींचे फायर व स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल तसेच एअर कुलर बाबतचे ऑडिट करून घ्यावे. पावसाळा, वादळ यादृष्टीनेही उपाययोजना करून घेण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील कामकाजाविषयी सविस्तर माहिती यावेळी मुख्यमंत्री यांना सादर केली. तसेच महानगरपालिकेचे कोरोना नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाचे डॉ.नितीन रावते, डॉ.अनिता हिरे, डॉ.किरण शिंदे, विशाल बेडसे, मेट्रन संध्या सावंत, फार्मासिस्ट टिकाराम गांगुर्डे, सिस्टर नानजर, हॉस्पिटलचे व्यवस्थापक विशाल कडाळे यांच्याशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.