विभागीय संदर्भ रुग्णालयासह पाच ठिकाणी होणार मेडिकल ऑक्सिजन निर्मिती – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अशी आहेत प्रकल्प वैशिष्ट्ये :

– उत्कृष्ट दर्जाचा वैद्यकीय प्राणवायू होणार उपलब्ध

– आठवड्यातील सातही दिवस होणार निर्मिती

– हाय टेम्परेचर, हाय किंवा लो प्रेशर, लो ऑक्सिजन, रिझर्व्ह सोर्स ॲक्टिव्ह होणे याबाबत मिळणार अलार्मद्वारे सूचना

– ऑक्सिजन उत्पादन, आऊटपुट  प्रेशर, सिस्टम स्टेटसबाबत डिजिटल डिस्प्लेद्वारे मिळेल सूचना

– ऑक्सिजन उत्पादन सनियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

– जागतिक मापदंडानुसार होणार उभारणी

अमरावती : विभागीय संदर्भ रुग्णालय व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील धारणीसह पाच ठिकाणी वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू निर्माण होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई- टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मितीला चालना मिळाली आहे. पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश दिले व प्रकल्प निर्मितीसाठी पालकमंत्र्यांनी वेळोवळी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने प्रकल्प निर्मितीच्या कार्याला वेग आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच रुग्णांना तातडीने प्राणवायू उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयासह पाच ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला 259 ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे.

विभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्राणवायू निर्मिती केंद्रात अनुक्रमे 88 ऑक्सिजन सिलेंडर, 58 सिलेंडर, 44 सिलेंडर, 19 सिलेंडर, 19 सिलेंडर, 31 सिलेंडर असे एकूण 259 ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती होणार आहे. ऑक्सिजन निर्मिती केंद्राची उभारणी होत असल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भरुन निघणार आहे.

जागतिक मापदंडानुसार होणार उभारणी

प्राणवायू प्रकल्प निर्मिती ही जागतिक आरोग्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार केली जाणार आहे. मेडीकल ग्रेड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक इन्टास्टलेशन, मेंटेनन्स, ऑक्सिजनचे उत्पादन ठरलेल्या स्टॅडर्डनुसार केल्या जाणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.