हडपसर येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक, 22 लाखाचा गांजा जप्त
पुणे : गांजाची वाहतूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने हडपसर परिसरातून अटक केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी 21 लाख 60 हजार रुपये किमतीचा 68 किलो गांजा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले जालना येथील रहिवासीी असून त्यात 3 महिलांचा समावेश आहे
दीपक भीमराव हिवाळे (वय 23), आकाश सुनील भालेराव (वय 27), आदित्य दत्तात्रय धांडे (वय 19), हिराबाई संतोष जाधव (वय 40), सरूबाई रतन पवार (वय 65) आणि पार्वती सुरेश माने (वय 57) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या हडपसर येथील श्रीनाथ वॉशिंग सेंटरसमोर एक कार संशयास्पदरीत्या उभी होती. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कारची झडती घेतल्यावर सीटच्या खाली दोन पोती व मागील सीटचे खाली दोन पोती अशी चार पोती आढळून आली. त्याचा वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा होता. पोती उघडल्यानंतर त्यात 13 लाख 60 हजार रुपयांचा 68 किलो 50 ग्रॅम गांजा आढळून आला. . त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी विक्रीसाठी हा गांजा आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक अमोल गवळी, पोलीस कर्मचारी संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदीप शेळके, साहिल शेख, अजीम शेख, महेश साळुखे, नितीन जगदाळे, दिनेश बास्तेवाड, दिशा खेवलकर, कल्याणी आगलावे यांच्या पथकाने केली.
~
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!