मोठ्याआवाजात टीव्ही लावल्याचा जाब विचारल्याच्या वादातून चौघांवर कोयत्याने वार, धनकवडीतील शांतीनगर वसाहतीतील घट

पुणे : मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना मोठ्या आवाजात टीव्ही आणि सिस्टिमचा आवाज मोठा ठेवल्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सहा महिन्यांपुर्वी झालेल्या वादावादीचा राग मनामध्ये ठेवून एका टोळक्याने पती-पत्नीसह त्यांच्या नातलगांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील शांतीनगर वसाहतीत घडली.या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील शांतीनगर वसाहतीत घडली. याबाबत महादेव अडसूळ (वय 36, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या महामारीमध्ये शाळा-कॉलेज बंद असून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. महादेव यांच्या मुलांचे सहा महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यावेळी त्यांच्या जवळच राहणाऱ्या ओळखीतील व्यक्तिने घरातील टीव्ही व साऊंड सिस्टिमचा खूप मोठा आवाज केला. त्यामुळे मुलांना त्रास होत असल्यामुळे महादेव यांनी संबंधित व्यक्तिला जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास महोदव अडसूळ यांच्याशी वाद घातला. त्यांच्यावर कोयत्याने डोक्यात व हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

ही भांडणे सुरू झाल्यानंतर तक्रारदार यांची पत्नी, मावशी, मावसभाऊ यांनादेखील टोळक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टोळक्याच्या हल्ल्यात चौघेजण गंभीर जखमी झाले असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती महिला सहायक पोलीस निरीक्षक किरण मदने यांनी दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.