रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविकेच्या मुलाला अटक
पुणे : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव अंकुश मळेकर (वय २०, रा. चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो चिखली प्रभाग एकच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी रविवारी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, खडकी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय २२) व वैभव मळेकर यांना अटक केली आहे.त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. वैभव मळेकर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे.त्या चिखली प्रभागातून निवडून आलेल्या आहेत.
डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात राहुल सुनील खाडे (वय २२) आणि विजय दिनकर पाटील (वय ३१) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विष्णु रामराव गोपाळघरे (वय ३४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
यातील आरोपींनी हे इंजेक्शन अवैधरीत्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किंमतीला विक्री करत होते. त्यांच्याकडे डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची विक्री करताना ते आढळून आले आहेत.या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!