धमक्या देऊन खंडणी उकळणे व ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे टोळीवर मोक्का कारवाई

पुणे :  ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये केलेली पैशांची गुंतवणूक परत घेण्यासाठी ज्वेलर्सला शिवीगाळ करीत धमक्या देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत दीप्ती काळेसह टोळीविरूद्ध पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. संबंधित टोळीने मागील 10 वर्षांत खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळणे, बनावट व्हिडिओ तयार करुन पैसे घेण्याचे अनेक गुन्हे केले आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. तर आयुक्तांचा हा 28 वा मोक्का आहे.

दिप्ती सरोज काळे (रा . ज्ञाती इक्वोटेरियम , सिडम , बावधन) आणि निलेश उमेश शेलार  (रा. कोथरुड) यांना अटक केली आहे. तर टोळीतील इतर फरार आहेत.

दीप्ती काळे टोळी प्रमुख असून, गेल्या दहा वर्षापासून या टोळीने कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याचे गुन्हे केले आहेत. गेली 10 वर्ष त्यांनी गुन्हे केले असून, आर्थिक फायदा घेतला आहे.

दिप्ती  काळे  आणि निलेश उमेश शेलार यांनी 2018 ते 2020 कालावधीत एका ज्वेलर्समध्ये गुंतवणुक केली होती. त्यानुसार पैसे परत मागण्यासाठी ते वेळोवेळी जेल्वर्स दुकानदार यांच्या घरी आणि दुकानावर येऊन शिवीगाळ व धमकी देत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन असभ्य भाषेत बोलून त्यांच्या मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक देखील केली आहे.

या गुन्ह्याचा तपास करत असताना दीप्ती काळे हिने गुन्हेगारी टोळी तयार केली असून मागील दहा वर्षापासून कट करून खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करून खंडणी मागणे, बनावट व्हिडीओ तयार करून संगणक साधनसामुग्रीचा वापर करून अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे सिद्ध झाले आहे. मागील दहा वर्षापासून टोळी प्रमुख दीप्ती काळे आणि तिच्या टोळी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे त्यांचेविरुध्द मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर दिप्ती काळे आणि टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.