राज्यात मोफत लसीकरण? अजित पवार म्हणाले…

मुंबई : राज्यात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हे लसीकरण महाराष्ट्रात मोफत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मलिक यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील नाराजी उघड झाली होती. त्यामुळं राज्यात मोफत लसीकरणाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२७ एप्रिल) भाष्य केले आहे. विधानभवनात आज ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, “उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारची मोफत लसीकरणाबाबत काय भूमिका आहे, यासंदर्भात चर्चा करणार आहोत. कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री चर्चेतून झालेला निर्णय स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगतील.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे. प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. उद्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात चर्चा होईल. या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व मंत्री आपली भूमिका मांडतील, त्यानंतर राज्यातील जनतेच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील.”

लसींच्या तुटवड्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,लसीची कमतरता संपूर्ण देशाला जाणवत आहे. केंद्र सरकारचं लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिविर इंजेक्शन कंपन्यांवर नियंत्रण आलं आहे. देशातल्या सर्व जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारने करायला हवं. पण भारत सरकारची भूमिका आहे ४५ पासून पुढे सगळ्यांना मोफत लसीकरण. पण ४४ वयोगटापर्यंतच्या लोकांचं काय? असं देखील आम्ही विचार करत आहोत. उद्या तशीच वेळ पडली, तर राज्य सरकार कुठेही मागे पडणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांना देखील खोचक शब्दांत सुनावलं. “सध्या महाराष्ट्रात रुग्णांचं प्रमाण जास्त दिसत आहे. त्यामुळे आम्हाला जास्त ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसीचा कोटा द्यायला हवा. आम्ही उद्या ग्लोबल टेंडरवर देखील चर्चा करणार आहोत. मध्ये काहींनी माझं (ग्लोबल टेंडरबाबत) वक्तव्य आल्यानंतर केंद्र सरकारची परवानगी नसताना यांनी परस्पर कसा निर्णय घेतला? अशी शंका उपस्थित केली. उद्या बाहेरून जर लस आणायचं म्हटलं आणि आपल्या देशातील सिरम आणि भारत बायोटेक तेवढं उत्पादन करण्यात असमर्थ असतील, तर देशाचे प्रमुख यासाठी परवानगी नाकारतील असं वाटत नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा लसीकरणाचा तिसरा टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लसीचा पुरेसा साठा आणि लसीची किंमत या दोन मुद्द्यांवर चर्चा सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा कसा उपलब्ध होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच, लसींची किंमत देखील अदर पूनावाला आणि भारत बायोटेकने वाढवली असल्यामुळे राज्यात मोफत लसीकरण करता येईल का? यावर चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.