स्फोटक कायद्यासह इतर गुन्ह्यात २६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद: स्फोटक कायद्यासह इतर गुन्ह्यात २६ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने मंगळवारी (ता.२७) बेड्या ठोकल्या. प्रविण विजयकुमार बोरसे (४९, रा. साईनाथनगर, बीड बायपास) असे त्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बोरसेविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने त्याला सापळा लावत अटक केली.

गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरात गस्त घालत असताना. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना खबऱ्या कडून माहिती मिळाली की, जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या १९९४ स्फोटक प्रकरणातील आरोपी हा बीडबाय पास येथे आलेला आहे.

या माहितीची खात्री पोनि आघाव यांनी केली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पवन इंगळे आणि त्यांच्या पथकाला बीडबाय पास येथे पाठविण्यात आले. त्याचा शोध घेत असताना, तो साईनाथ नगर येथे असल्याचे कळताच पोलिसांनी साईनाथ नगरकडे मोर्चा वळवत आरोपी प्रवीण बोरसेला ताब्यात घेतले.

बोरसेविरोधात १९९४ साली गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. न्यायालयाने बोरसेविरोधात समन्स काढत सदर खटला डॉर्मंट स्थितीवर ठेवून आरोपीला फरार घोषीत केले होते. आरोपीला अटक करुन जवाहनगर पोलिसांच्या हवाली केले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक पवन इंगळे, प्रभात म्हस्के, सचिन घुगे, नितीन धुळे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.