तक्रारदार तरूणीच्या घरातून ॲपल कंपनीचे घड्याळ चोरणाऱ्या फौजदारावर निलंबनाची कारवाई..!
पिंपरी चिंचवड : चहा पिण्याच्या बहाण्याने तक्रारदार तरुणीच्या घरातून अँपल कंपनीचे महागडे घड्याळ चोरल्या प्रकरणी फौजदाराचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ३०) याबाबचे आदेश दिले आहेत. प्रशांत राजेंद्र रेळेकर (नेमणूक – हिंजवडी पोलीस ठाणे) असे निलंबित फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता आहे. याबाबत 24 एप्रिल रोजी तरुणी तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा हिंजवडी पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. दरम्यान, गाडीमध्ये “आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो, मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्यासोबत चल,’ असे बोलून लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला.
घरी पोहचल्यानंतर रेळेकरने “आपण खूप कंटाळलो आहे” असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आईदेखील घरात होत्या. दरम्यान, चहा पिताना रेळेकर याने चार्जिंगला लावलेलं ॲपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले. त्यानंतर तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकरने तरुणीचे घड्याळ माघारी दिले. रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.
‘सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोणीही गैरप्रकार करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. सगळीकडे असे प्रकार घडत असतात. मात्र, पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाईल, या भीतीने प्रकरण दाबण्यात येत. मात्र, माझ्याकडे चुकीला माफी नाही. मी कोणालाही पाठीशी घालत नाही.’
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!