चढ्या दराने रेमडेसिव्हर इंजेक्‍शन विकायला आलेल्या दोघा मावस भावांचा आणि त्याच्या मैत्रिणीचा पर्दाफाश

पुणे : काळ्या बाजारात चढ्या दराने रेमडेसिव्हर इंजेक्‍शन विकायला आलेल्या दोघा मावस भावांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोघांना सापळा रचून अटक केली आहे.त्यांच्या जवळून तीन इंजेक्‍शन हस्तगत करण्यात आली असून ती 1 लाख 5 हजारांना विकायच्या तयारीत आरोपी होते. तरुण-तरुणी बी-फार्मसी शिक्षण घेत आहे.

निखल बाबुराव जाधव(वय 24,रा.आंबेगाव पठार व मयूर विजय चव्हाण(वय 22,रा.वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नाव आहेत. तर शामली अकोलकर हिच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा पथकासह गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना  नवले पूल परिसरात रेमडेसिव्हर इंजेक्शनची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले आणि त्यांच्याकडे इंजेक्शन खरेदीसाठी पाठवून सापळा रचण्यात आला. निखील व मयुर दोघेही तळेगाववरुन तीन इंजेक्‍शन घेऊन एसयूव्ही कारमधून आले. त्यांना चौकशी करुन ताब्यात घेतले असता शामली ही तरुणी दोघांमार्फत इंजेक्शन विक्री करताना समोर आले. त्यांनी 37 हजार रुपयांना एक असे 1 लाख 5 हजार रुपयांना तीन इंजेक्शन देण्याचे ठरविले. त्यानुसार इंजेक्शन घेताना या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर त्या तरुणीला आज ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे 3 इंजेक्शन, कार आणि मोबाईल असा 8 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान हे इंजेक्शन नोव्हेंबर 2020 मधील आहेत. त्यामुळे ते शासकीय रुग्णालयातुनच मिळाले असावे असा संशय आहे. त्यांनी हे इंजेक्शन फॉर्म भरून मिळवले असण्याची शक्यता आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, विवेक जाधव व अमर पवार यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.