बारामतीत राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार; 24 तासात चार आरोपी अटक

बारामती :बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे उर्फ चिकू पाटील यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार होता. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या गोळीबार प्रकरणातील चौघांच्या मुसक्या बारामती पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आवळल्या. एका अल्पवयीन मुलाचा देखील यामध्ये समावेश असून अल्पवयीन मुलानेच रविराज यांना गोळी घातल्याचे उघड झाले आहे. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रशांत मोरे, राहूल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टॉम मोरे यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यातील ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने गोळी घातली.

तालुक्यातील माळेगाव संभाजीनगर येथे राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना काल दि (31 )रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संभाजीनगर येथे वडापाव स्टॉल च्या शेजारी उभ्या असताना त्यांच्यावर गोळी घालण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत मोरे हाच याप्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.प्रशांत मोरे यास मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.वेगवान तपास करत चोवीस तासाच्या आत चौघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

अल्पवयीन मुलगा हा दहावी इयत्तेत शिकत असताना पिस्तूल खरेदी केली अशी माहिती दिली असून पोलिस यासंदर्भात अधिक चौकशी करीत आहेत.पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास केला. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी वेगवेगळी पथके रवाना केली.

या प्रकरणातील एक आरोपी उरळीकांचन येथील असून त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.