भाजप नगरसेवकाच्या अटकेनंतर अजित पवारांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा; पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड : खोटी कागदपत्रे तयार करून प्राधिकरणाच्या जागेची परस्पर विक्री करणारे भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे सोमवारी (दि. ३१) करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन निवेदन दिले. कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना‌ काटे, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक विक्रांत‌ लांडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, अमित लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार भोसरी पोलिस ठाण्यात भाजपचे नगरसेवक राजेंद्र किसनराव लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या अटकेनंतर भाजपच्या वतीने सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.

भाजप नगरसेवक यांच्या विरोधात प्राधिकरणाकडून देण्यात आलेली तक्रार आणि पोलिसांकडून झालेली कारवाई या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा आमच्या नेते अजितदादा पवार यांचा कोणताही संबध नाही. ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची आहे. तरी देखील फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत भाजपकडून बदनामी, अपप्रचार सुरू आहे. या पध्दतीने बदनामीकारक मजकूर विविध माध्यमातून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रसिध्द करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.”

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.