सोसायटीच्या टाकीत पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे :  सोसायटीच्या टाकीत पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात उघडकीस आली आहे. रविवारी हा प्रकार घडला आहे. विठ्ठल अंकुश वायकुळे (वय 30, रा. पार्थवी सोसायटी, नर्हे) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड  पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल अविवाहित आहे. तो मूळचा लातूर येथील आहे. वारजेतील एका औषध निर्माण कंपनीत तो कामाला होता. पार्थवी सोसायटीतील सदनिकेत तो दोन मित्रांबरोबर राहत होता. दरम्यान रविवारी तो सोसायटीत असणाऱ्या पाण्याचा टाकीत पडल्याचे समोर आले. त्याच्या मित्राने सिंहगड रोड पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी रात्री तो मित्राकडे पार्टी करायला गेला होता. तेथून मध्यरात्री तो सोसायटीत आला. पण, सोसायटीच्या टाकीत नेमका कसा पडला, हे समजू शकलेले नाही.याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.