आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून भररस्त्यात दगड, सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून एकाचा खून, दापोडी परिसरातील घटना

पिंपरी चिंचवड: आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका मद्यपीने दुसऱ्या मद्यपीचा भर रस्त्यात दगड,सिमेंटचा ब्लॉक व फरशीने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. नरवीर तानाजी पुतळ्या जवळ,दापोडी याठिकाणी मंगळवारी (दि.1) दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.आरोपीला घटनास्थळावरून पोलीसांनी अटक केली आहे.

अनिल चिंतामण शिंदे (वय 48, रा. लिंबोरे वस्ती, दापोडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, यश महादेव गोपी (वय 21, रा. लिंबोरे वस्ती, दापोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खून झालेल्या व्यक्तीचा भाऊ संतोष चिंतामण शिंदे (वय 41, रा. सिद्धार्थ नगर, बोपोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दापोडीत भर वस्तीमधून एकमेकांची तोंड ओळख असलेला आरोपी यश आणि अनिल हे जात होते, तेव्हा दोघांनी मद्यपान केले होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि अनिल शिंदे याने यशला आईवरून शिवीगाळ केली. आईवरून शिवीगाळ केल्याने यशला प्रचंड राग अनावर झाला व त्याने संतपाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड,सिमेंटचा ब्लॉक व फरशी जोरात अनिलच्या डोक्यात  मारुन खून केला.

दरम्यान, या घटनेची माहिती भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांना फोन करून देण्यात आली व त्यांना बोलावण्यात आले. ते त्याच परिसरात असल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी यश हा अनिलला दगडाने ठेचून मारत असताना ताब्यात घेतलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेत अनिलचा मृत्यू झाला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.