दारू पित असताना झालेल्या वादातून मित्राचा खून, डेक्कन परिसरातील घटना

पुणे : दारू पित असताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात भिंतीवर लावलेला फायर सेफ्टीचा लाल डब्बा घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार  डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानात घडली आहे.याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजन रमेश सहानी (वय २७, रा. वारजे नाका) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (वय २१, रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

राजन हा पेटिंगचे काम करतो. राजन आणि किसन दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. किसन काहीही कामधंदा करीत नाही़ रविवारी दुपारी दोघेही दारु पिण्यासाठी अड्ड्यावर आले होते. तेथून ते सिंहगडावर गेले. तेथे त्यांनी दारु पिली. रात्री उशीर झाल्याने किसन हा राजनला घेऊन गरवारे शाळेत आला. किसन हा तेथे शिकला असल्याने रात्री उशीर झाल्यावर तो कंपाऊंडवरुन उडी मारुन येथील व्हरांड्यात झोपत असे. त्याप्रमाणे दोघेही कंपाऊंडवरुन उडी मारुन आत आले.

दुसर्‍या मजल्यावरील व्हरांड्यात त्यांनी पुन्हा उरलेली दारु पिली. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. सध्या शाळेत रंगकाम सुरु आहे. तेथे एक फावडे पडले होते. ते राजनने किसनच्या हातावर मारले. त्यामुळे किसन याने भिंतीवरील फायर सेफ्टीचा लाल डब्या काढून राजनच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने राजन जागेवरच निपचित पडला. त्यानंतर किसन याने त्याला ओढत एका क्लासरुममध्ये नेले. तेथे पुन्हा त्याला दोन तीन वेळा मारले. त्यानंतर तो सकाळ झाल्यावर घरी निघून आला.

इकडे राजन परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. शेवटी मंंगळवारी दुपारी त्यांनी वारजे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, किसन हा बुधवारी पहाटे पुन्हा गरवारे प्रशालेत आला. त्याने कंपाऊंटवरुन उडी घेऊन आत प्रवेश केला. काल ते बसले होते, त्या दुसर्‍या मजल्यावरील क्लासरुममध्ये गेला. तेव्हा त्याला राजनचा मृतदेह तेथेच पडलेला दिसून आला. त्यानंतर तो थेट समोरील डेक्कन पोलीस ठाण्यात आला. त्याने स्वत: पोलिसांना मला अटक करा, मी मित्राचा खुन केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गरवारे शाळेत जाऊन खात्री केली. तेव्हा तेथे राजन याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन किसन वरपा याला अटक केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.