अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीची हिस्सेदार म्हणून नोंद,आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल; मावळ तालुक्यातील घटना
मावळ : अस्तित्वात नसलेल्या एका व्यक्तीची आणि मृत्यू झालेल्या एका व्यक्तीची हिस्सेदार म्हणून नोंद केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2013 पासून 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय आंबी व तलाठी कार्यालय राजापूरी तालुका मावळ येथे घडला.
श्रीरंग वाल्हू शिंदे, महादू वाल्हू शिंदे, बाजीराव वाल्हू शिंदे, मारुती तारू शिंदे, राजेश तारू शिंदे (सर्व रा. राजपुरी, ता. मावळ), दिलीप बारकू जगताप (रा. माऊ, ता. मावळ), गाव कामगार तलाठी मौजे राजपुरी मावळ, मंडल अधिकारी मौजे तळेगाव दाभाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत यशवंत भिवा शिंदे (वय 81, रा. राजपुरी आंबी ग्रुप ग्रामपंचायत, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वडिलोपार्जित मालकीची राजपुरी येथे जमीन आहे. त्या जमिनीचे सहा हिस्सेदार म्हणून जिजा सावळा शिंदे व वाल्हू सावळा शिंदे यांच्या नावाच्या नोंदी होत्या. मात्र जिजा सावळा शिंदे या नावाचा इसम अस्तित्वात नाही तसेच वाल्हू सावळा शिंदे हे मयत आहेत. असे असताना आरोपींनी संगणमत करून तलाठी कार्यालय राजपुरी येथे वारस नोंदी करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!