भाजपकडून गोरगरिबांची फसवणूक, जनतेची माफी मागा : संजोग वाघेरे

पिंपरी चिंचवड :  केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून कोणतेही आदेश नसताना, नियमात आर्थिक मदतीची तरतूद नसताना आणि राज्यातील कोणत्याही महापालिकेने असा निर्णय घेतलेला नसताना शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गोर गरिबांना तीन हजार रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपने केली. प्रत्यक्षात नियमानुसार ही मदत करता‌ येत नसल्याने भाजपने हा प्रसिध्दी स्टंट करून शहरातील गोरगरिबांची फसवणूक केली. त्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांनी शहरातील गोर गरिबांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

वाघेरे‌ म्हणाले, आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सतत बिनबुडाचे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करणा-या भाजपने गोर गरिबांना सरकारकडून दिल्या जाणा-या मदतीवरून राजकारण केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना तीन हजार रुपये मदत करण्याची फसवी घोषणा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. अशा पध्दतीने मदत करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका म्हणून सत्ताधारी भाजपने मोठा प्रसिध्दी स्टंट केला.

काही दिवसात ही मदत थेट खात्यात जमा होणार म्हणून शहरातील गोर गरिबांना आशेला लावले. प्रत्यक्षात ही घोषणा करताना या पध्दतीने आर्थिक मदत करणे महापालिकेला शक्य आहे किंवा कायद्यात तशी तरतूद आहे का, याचा कोणताही विचार भाजपने केला नाही. गल्ली ते दिल्ली जुमलेबाजी हे एकच धोरण मागच्या सात वर्षात भाजपने राबविले आहे.

आश्वासने देऊन फसविण्याचे अनेक रेकॉर्ड भाजपने केले आहेत. त्या रेकॉर्डमध्ये पिंपरी-चिंचवड भाजपने आणखी भरच घातली आहे. भाजपचे खायचे अन्‌ दाखवायचे दात वेगळे आहेत. तेच शहरातील गोर गरिब नागरिकांच्या बाबतीत त्यांनी केलेले आहे. परंतु स्वत:ची चूक कबूल करण्याची नैतिकता नसलेल्या भाजपने आता कांगावा सुरू केला आहे. या निर्णयाला ते आता आयुक्तांना दोष देत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.