“नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण?”; उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले!

पुणे : शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवाल भाजपा नेते नारायण राणे यांनी काल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत, नारायण राणेंवर जोरदार टीका केल्याचे दिसून आले.

पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्या वेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत, शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं.”

तसेच, “शरद पवार यांनी नेहमीच ५० वर्षांच्या राजकीय जीवनात काम करत असताना, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आहे. आताही शरद पवार यांची भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे. इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तशा प्रकरचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. नारायण राणेंना समजत नाही का? सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे. हा काही सरकारने निर्णय घेतला आहे का? उलट मीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी, पृथ्वीराज चव्हाण यांना शिफारस केली होती की, यामध्ये नारायण राणेंना प्रमुख नेमा व त्यांना यामध्ये लक्ष घालायला सांगा.” असंही यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवलं.

लॉकडाऊनसंदर्भात काय म्हणाले अजित पवार 

अनलॉकच्या गोंधळासोबत बोलताना अजित पवार  म्हणाले की, राज्याचे प्रमुख या नात्याने उद्वव ठाकरेंनी जो निर्णय लॉकडाऊनच्या बाबतीत घेतलाय तोच अंतिम आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निर्बंध शिथिल करण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार आहोत.  पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पॉझिटीव्हीटी रेट पाच टक्क्यांहून कमी आहे. मात्र इतर जिल्ह्याचा जास्त आहे. त्यामुळे वेगवेगळे निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले. दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी पुण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की त्यांचा एक शब्द चुकला. म्हणून तर आम्ही या फंदात जास्त पडत नाही, असा टोमणा त्यांनी मारला.

वारीसाठी स्वतंत्र कमिटी नियुक्त

आषाढी वारीबाबतही अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचं संकट वाढल्याचं आपण पाहिलं. वारकऱ्यांनाही ते समजून सांगण्यात आलं. पण वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून अजून एक संधी देऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश या कमिटीमध्ये असेल. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वारीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजितदादांनी दिलीय.

‘खेडमधील वाद चर्चेतून मिटवू’

महाविकास आघाडीने सरकारमध्ये काम करताना वरिष्ठ पातळीवर एकोप्यानं राहण्यांचं ठरवलं आहे. तो तळागाळापर्यंत वेळ लागतो. आम्ही राष्ट्रवादीच्या खेडमधील पदाधिकाऱ्यांना सांगू. शिवसेनेनंही तिथल्या पदाधिकाऱ्यांना सांगून हा वाद मिटवला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.