गुंजाळ टोळीवर पुणे पोलिसांची मोक्का कारवाई
पुणे : दरोडे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, चोरी यासारख्या गंभीर गुन्हे करणाऱ्या गुंजाळ टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी या टोळीचाप्रमुख ओमकार शंकर गुंजाळ याच्यासह चार सदस्यांना अटकही केली आहे.
ओंकार शंकर गुंजाळ (वय 24), प्रदीप उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय 23), इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय 19), गणेश रामदास काळे (वय 32) आणि विजय नंदू राठोड (वय 22) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी 30 एप्रिलच्या सकाळी वाघोलीत एका व्यक्तीला गाडीने कट का मारला असे म्हणून भर रस्त्यात अडवून त्याच्याजवळील साडे तेरा लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना ओंकार गुंजाळ आणि त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम 7 लाख 14 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, 4 मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या होत्या.
दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी तयार करून अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना पाठवला होता.
त्यानंतर या प्रस्तावाची छाननी करून ओंकार गुंजाळ आणि त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात आतापर्यंत मोक्का अंतर्गत 31 टोळ्यांवर कारवाई करण्यात आली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!