चैन स्नॅचिंग गुन्हयातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद ,५ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस ; पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

पुणे : चैन स्नॅचिंग गुन्हयातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुणे जिल्हयातील ५ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. फिदा हुसेन मनुआली इराणी (रा.पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२१ रोजी पुरुषोत्तम प्रकाश बेहरा (रा.शिरुर जि.पुणे) हे पुणे-नगर रोडने जात असताना कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे ग्रीन गार्डन हॉटेल जवळ आले असताना त्यांचे पाठीमागून एका अज्ञात इसमाने मोटरसायकलवर येवून फिर्यादीचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरुन शिकापूर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत होते. तपासामध्ये त्यांना आरोपीचे सीसी टीव्ही फुटेजही मिळालेले होते. त्यावरून सदर सीसी टीव्ही फुटेज मधील आरोपी हा पुणे शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फिदा हुसेन मनुआली इराणी हाच असल्याची माहिती समजली होती. त्याची पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता तो सध्या कोणताही कामधंदा करत नसून त्याचेकडे असलेल्या करडे रंगाचे सुझुकी बर्गमॅन मोटार सायकल नं.एमएच १२ एससी ३६८२ चा वापर करून रोडने जाणारे येणारे लोकांची लुटमार करतो अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस सदर दुचाकीचा शोध घेत होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-नगर रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदर नंबरची दुचाकी पुणे-नगर रोडने जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन तिचा पाठलाग करुन कोरेगाव भिमा येथे आडवून त्यावरील इसम फिदा हुसेन मनुआली इराणी वय २३ वर्षे रा.पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे यास ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल नं.एमएच १२ एससी ३६८२ असा एकूण किंमत रुपये ९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे मोबाईलबाबत पोलीसांनी त्याचेकडे चौकशी केली असता विवो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा ग्रीन गार्डन हॉटेल जवळ एका इसमाकडून जबरदस्तीने हिसकावल्याचे व ओपो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा जवळील गंधर्व गार्डन्स हॉटेल जवळ एका इसमास, ‘तू तुझे मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले? असे म्हणून त्याचे लक्ष विचलीत करून हातातून हिसकवल्याचे सांगितले आहे. त्याचेकडे आणखीन पोलीसी खाक्यात चौकशी केली असता त्याने कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे ३ ठिकाणी तसेच शिक्रापूर-चाकण रोड व दौड-पाटस रोड येथे एका ठिकाणी अशा प्रकारे मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याचे सागितले. प्रतिकार केल्यास तो चाकूचाही धाक दाखवत होता. त्याबाबत खात्री केली असता त्याने एकूण ५ ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पुणे शहर येथे १८, हैद्राबाद (तेलंगणा) येथे ११ व गोवा येथे २ असे चैन, मोबाईल स्नॅचिंगचे एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचे वस्तीमध्ये पोलीस पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर यापूर्वी हल्ला केलेला आहे.

सदर आरोपीने आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेऊन पुढील अधिक तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु गायकवाड, मंगेश थिगळे, गुरु जाधव, अक्षय नवले, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.