हिंजवडी परिसरातील दारुभट्टीवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड : हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने  शुक्रवारी (दि. 4 ) कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 3 लाख 52 हजार 330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या अंगणात पुरायची. कालांतराने त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नेरे दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवाजी नगर, हिंजवडी येथे एक महिला ही तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात तयार केलेली गावठी हातभट्टीची दारु प्लास्टीक कॅन्समध्ये साठवून ते कॅन जमिनीमध्ये पुरत होती. त्यानंतर तिला शक्य त्या वेळी ती त्या दारूची वाहतूक करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला शुक्रवारी (दि. 4)  मिळाली.त्यानुसार पोलिसांनी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन लाख 80 हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, 500 रुपयांची मोकळी टाकी, 200 रुपयांचा एक पाईप असा एकूण तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ.  प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक . विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके, पोउपनि प्रणिल.चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.