पुण्यातील पिरंगुटमधील कंपनीस भीषण आग, 15 महिलांसह 17 जणांचा मृत्यू

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 7) दुपारी घडली. या आगीत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 महिला दोन पुरूष आहेत. 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 15 दिवसांपुर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती स्थानिक देत आहेत.

मंगल नागु आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगल आखाडे यांचा कामाचा आजचा पहिला दिवस होता. हा पहिलाच दिवस आय़ुष्याचा शेवटचा दिवस ठरला

मिळालेल्या माहितीनुसार, आज 41 कामगार कामावर उपस्थित होते. 17 कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करीत होते. त्यांची खोली बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत त्यांचा मृत्यू झाला. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होते. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल शर्थींचे प्रयत्न करत आहे.

दरम्यान, या ठिकाणी 17 कामगारांचा आतमध्ये अडकून पडल्यामुळे मृत्यू झाला. इमारतीच्या आत नसलेले अन्य काही कामगारांना वाचविण्यात यश मिळाले आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. आगीचे प्रमाण प्रचंड असल्याने 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दल आग विझवण्यासाठी पराकाष्टा करत आहे, परंतू आग मोठी आसल्याने विझवणे कठीण जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.