मोदींची मोठी घोषणा! 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस

नवी दिल्ली : देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.  याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार  80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं.

ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये 150 रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात. या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावं, असं मोदी म्हणाले.

देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

 

कोरोना मागील 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी

इतर देशांच्या प्रमाणे भारताला देखील कोरोना संकटामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोरोना गेल्या 100 वर्षात आलेली सर्वात महामारी आहे. अशी महामारी आधुनिक जगाने पाहिली नाही आणि अनुभवली नाही. एवढ्या मोठ्या महामारीचा देशाना एकत्र येत सामना केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटलं आहे.

तर 40 वर्ष लसीकरणाला लागले असते

कोरोना विरोधात कोव्हिड प्रोटोकॉल आणि व्हॅक्सिन संरक्षण कवच म्हणून उपयोगी पडले आहे. जगातील अनेक देशाला व्हॅक्सिनची मोठी गरज होती. पण त्यांच्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नव्हत्या. भारताकडे व्हॅक्सिन नसती तर काय झालं असतं याचा विचार करा, असं ते म्हणाले. 2014मध्ये व्हॅक्सिनेशनचे कव्हरेज 60 टक्के होते. या गतीने व्हॅक्सिनेशन केलं असतं तर 40 वर्ष लसीकरणाला लागले असते. मात्र आपण व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवला. त्याची व्याप्तीही वाढवली. भारतात आतापर्यंत 23 कोटी व्हॅक्सिन देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (Centre to provide free vaccines to all from June 21, says PM Modi)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.