वृद्ध पत्नीला मारहाण भोवली, अखेर गजानन बुवा चिकणकरला बेड्या

कल्याण : एक वृद्ध माणूस आपल्या पत्नीला लाथा-बुक्क्याने मारहाण करत असल्याचा व्हिडीओ  सध्या व्हायरल झालाय. तुम्हीदेखील हा व्हिडीओ नक्कीच पाहिला असेल. हा संतापाजनक प्रकार घडलाय कल्याण  जवळील द्वारली गावात… सुमारे आठवड्याभरापूर्वी हा व्हिडीओ शूट केल्याचं सांगितलं जातंय. एका वृद्ध माणूस आपल्या पत्नीला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करत असताना त्याच्या नातवाने हा व्हिडीओ शूट केला आणि त्यामुळे आजोबा करत असलेला हा अमानवी प्रकार उजेडात आला. घडलेला प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी आजीबाईंना तक्रार दाखल करण्यास सांगितले. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने अखेर सामाजिक दबाव लक्षात घेता पोलिसांनीच त्या माणसावर गुन्हा करत आरोपीला अटक केली आहे. गजानन बुवा चिकणकर करणाऱ्या आजोबांचं नाव आहे. त्यांना पोलीसांनी अटक केली आहे

कल्याणच्या द्वारली या गावामध्ये राहणारे गजानन चिकणकर हे स्वतः बुवा असल्याचं सांगतात. मात्र भक्तांना उपदेश देणाऱ्या या महाराजांनी स्वतःच्या पत्नीलाच बेदम मारहाण केली होती. 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला काम करत नसल्याच्या कारणाववरून त्यांनी मारहाण केली होती. विशेष म्हणजे या बुवांना दोन बायका आहेत. त्यापैकी पहिल्या पत्नीला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. आजुबाजुला असलेल्या इतर महिला आणि कुटुंबातील व्यक्तींनीही त्यांना अडवलं नाही.

घरात पाण्याच्या वादावरुन एका 85 वर्षीय वृद्धाने 80 वर्षीय त्याच्या पत्नीला जाब विचारत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. इतकंच नव्हे तर आपल्या पत्नीला जाब विचारत असतानाही ते प्रचंड आक्रमक आवेशात बोलताना दिसत आहेत. पत्नीने आपल्याला उलट उत्तर केल्याच्या रागातून ते त्या वृद्ध महिलेला सुरूवातीला हाताने आणि लाथेने मारताना दिसतात. तर काही वेळाने राग अनावर झाल्यावर ते आपल्या पत्नीला चक्क प्लॅस्टिकच्या बादलीने मारहाण करतानाही दिसतात. व्हिडीओमध्ये पत्नी आपल्या पतीला वारंवार विनवणी करताना दिसते. रडत रडत ती आपल्या पतीला ‘मला मारु नका’ असं सांगतानाही दिसते. पण त्या विनवणीचाही चिकणकर बुवांवर काहीच परिणाम होत नाही. उलट ते काही वेळाने पुन्हा येऊन परत पत्नीला बादलीने मारहाण करतात.संबंधित घटना ही 31 मे रोजी घडली

व्हिडीओदरम्यान एक घरकाम करणारी महिला तेथेच उभी असलेली दिसते. पण ती ही मारहाण गपचूप पाहत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा आजीबाईंचा नातू मारहाण सुरू असताना ‘बास झालं…’ असं घाबरत घाबरत म्हणताना दिसतो. पण तोदेखील मारहाण थांबवायला येत नाही. गजानन बुवाच्या 13 वर्षीय नातवाने संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नराधम वृद्ध पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांवर अखेर सामाजिक दबाव वाढल्याने त्यांनी सु मोटोने गजानन बुवा चिकणकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे .

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस चिकणकर बुवांच्या घरी गेल्याचंही वृत्त आहे. पण त्यावेळी चिकणकर बुवा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्याचं त्यांना सांगितलं गेलं. तसेच, त्यांच्या पत्नीनेही कोणतीच तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नसल्याचे चित्र होते. सुरूवातीला पोलिस चिकणकर बुवांना केवळ समज देणार असल्याची माहिती होती पण अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी बुवांवर कलम 323, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हिललाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.