मोठी बातमी ! रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध ; बदनामीच्या भीतीने हत्या

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे (Rekha Jare) खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बोठेचे जरे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचे वाद झाले. यामुळे होणाऱ्या बदनामीच्या भीतीतूनच बाळ बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याचे अखेर पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात हत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह जनार्दन चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी. अनंतलक्ष्मी, व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व  रा. हैदराबाद) व महेश तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात ४५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून हत्या करणे तर उर्वरित सहा जणांविरोधात फरार आरोपीला मदत करणे असा दोष ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणातील एक दोषारोपत्र पूर्वीच दाखल झालेले आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध हे ४५० पानांचे पुरवणी दोषारोपत्र आज (मंगळवार) पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. मुख्य आरोपी बोठे याच्यासह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरुद्ध त्यात आरोप ठेवण्यात आला आहे. साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषणाची कागदपत्रे, घटनेसंबंधी मिळालेले पुरावे यांचाही तपशील यात आहे. बोठेचा आय फोन मात्र अद्याप प्रयोगशाळेतून तपासून आलेला नाही. त्यामुळे त्यासंबंधी हाती येणारे पुरावे नंतर सादर केले जातील, असेही पाटील यांनी सांगितले. बोठे सध्या पारनेर येथील तुरुंगातच न्यायालयीन कोठडीत आहे. दोषारोपपत्र पारनेला दाखल झाले असून नंतर ते नगरच्या जिल्हा न्यायालयात पाठविले जाऊन तिथेच त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीलाच पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. त्यामुळे सुरुवातीला अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात पहिले दोषारोपपत्र दाखल केले होते. बोठे याला तब्बल १०२ दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली. या अटकेला येत्या १० जून रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी हे दोषारोपत्र दाखल होणे आवश्यक होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू होती.

तपासात मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पुरावे गोळा केले. यापूर्वीच्या आरोपींकडूनही पुरावे मिळाले. शिवाय आरोपी आणि जरे यांच्या घरीही छापे घालण्यात आले होते. आरोपी बोठे याला मदत करणार्‍या २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एकूण समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे जरे आणि बोठे यांचे सुरुवातीला प्रेमसंबंध होते. पुढे त्यात विविध कारणांमुळे वाद होत गेले. शेवटी हा प्रकार उघड होऊन आपली बदनामी होईल, या भीतीने बोठे याने सुपारी देऊन हा खून करवून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.