आजारपणाला कंटाळून मुलाने केला वडिलांचा खून, मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला ; उरुळी कांचन परिसरातील घटना

उरुळी कांचन : आजारपणाला वैतागून दारुड्या मुलाने आपल्या ६७ वर्षीय वडिलांचा गळा आवळून खून केला. वडिलांचा प्राण गेला की नाही हे पाहण्यासाठी ब्लेडच्या साहय्याने गळा कापला. व त्यानंतर आपण केलेले कृत्य लपविण्यासाठी मृतदेह तीन दिवस घरातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून मृतदेह आज (गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दफन करण्यासाठी नेत असताना उघडकीस आला आहे.

रहीम गुलाब शेख (वय ६७) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर नईम रहीम शेख (वय ३८) असे आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांची मुलगी शहेनाज रशीदखान जमादार ( वय ६७, रा. उरुळी कांचन) यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नयीम शेख याने सात वर्षांपूर्वी अशाच प्रकारे ब्लेडच्या साहय्याने आपल्या पत्नीवर वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रहीम गुलाब शेख हे पत्नीच्या निधनानंतर आपली मुलगी शहेनाज यांच्याबरोबर राहत होते. त्यांचा मुलगा नईमही आपल्या बहिणीकडेच राहत होता.रहीम शेख हे मागील काही वर्षांपासून आजारी असल्याने घरात झोपून होते. तर नयीम शेख हा दिवसभर दारू पिऊन गावात फिरत होता .तो किरकोळ स्वरुपात मोटरसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करत असे. तर त्याची बहीण शहनाज रशीदखान इनामदार ही धुनीभांडी करून वरील दोघांना संभाळत होती.वडील गेल्या अनेक दिवसापासून आजारी असून जागेवरच झोपून होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी केली होती. आज त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नयीम याने सात वर्षांपूर्वी बायकोवर ब्लेडने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने ती तिच्या माहेरी राहते.

 

दरम्यान,८ जूनला दुपारी मुलाचे व वडिलांचे किरकोळ भांडण झाले. त्यात नयीमने रहीम शेख यांना मारहाण करून त्यांचा गळा आवळला. गळा आवळल्यानंतर रहीम शेख यांची हालचाल बंद झाल्यानंतर नयीम याने ब्लेडच्या साहय्याने बापाचा गळा कापला. या भांडणात नयीम याची बहिण शहनाज वडिलांना सोडविण्यासाठी आली असता, नयीम याने बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसवले. व रहिम शेख यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवला. वडिलांना मारल्यानंतर मागील ३६ तासांपासून मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत घरात पडून होता. आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नयीम याने वडील मयत झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. व चार वाजता वडिलांना दफन करणार असल्याचे नातेवाईकांना कळविले. ही बाब नयीम याच्या पत्नीला समजल्याने तीही सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आली होती.

दरम्यान, नयीम याची पत्नी सासरे, रहीम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रहीम यांच्या मृतदेहाजवळ गेली असता, तिला रहीम यांच्या गळ्यावर वार असल्याचे लक्षात आले. यावर नयीम याच्या पत्नीने शहनाजला बाजूला घेऊन रहीम यांच्या गळ्यावरील जखमेबाबत विचारणा केली असता, शहनाजने नयीम याने आपल्या वडिलांच्या समवेत केलेल्या धक्कादायक कृत्याची माहिती नयीमच्या पत्नीला दिली. यानंतर नयीमच्या पत्नीने शहनाज समवेत साहय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नयीम याला रहीम यांचा खून केलेल्या संशयावरून ताब्यात घेतले असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.