परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – वर्षा गायकवाड
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!