बेकरी पाव विक्रीच्या आडून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा हडपसर पोलिसांनी केला पर्दाफाश, 14 दुचाकी जप्त
पुणे : बेकरी पाव विक्रीच्या आडून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या टोळीतील दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून 4 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
फैज आरिफ अन्सारी उर्फ बेनटेन (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकींची चोरी करणारे सराईत तिघेजण शेवाळेवाडीकडून मांजरी गावच्या रस्त्याने जाणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अकबर शेख आणि प्रशांत दुधाळ यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सापळा रचला होता.
याच दरम्यान पोलिसांनी सोलापूर रोडने मांजरीकडे एका दुचाकीवरून तिघेजण येत असताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन होते.
त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्र विषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली.
आरोपी फैज उर्फ बेनटेन हा हडपसर परिसरातच पाव विक्रीचा व्यवसाय करतो. हा व्यवसाय करत असताना तो परिसरातील वाहनांची रेकी करत असे व त्यानंतर वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने त्याची चोरी करत असे.त्याच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आणून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!